मुंबई – युध्दाची दाहकता कमी होण्याची शक्यता वाढल्यामुळे मंगळवारी जागतीक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही खरेदी होऊन निर्देशांकांत वाढ झाली. जागतीक बाजारात क्रुडचे दर कमी होत असल्यामुळेही निर्देशांकांना काही प्रमाणात आधार मिळाला.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेसेक्स 350 अंकांनी वाढून 57,943 अंकांवर बंद झाला. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 103 अंकांनी म्हणजे 0.60 टक्क्यानी वाढून 17,325 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी, भारती एअर टेल, अल्ट्रा टेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, डॉ रेड्डीज, सन फार्मा, इन्फोसीस, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर आयटीसी, टाटा स्टील, स्टेट बॅंक, इंडस्इंड बॅंक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली. जागतीक बाजारात सकारात्मक वातावरण असल्यामुळे कालही शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली होती.
लवकरच स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. त्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेवर युध्दाचा किती परिणाम होणार आहे याचा अंदाज येणार आहे. त्या आधारावर गुंतवणूदार पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता निर्देशांक आणखी कमी होणा नाहीत असे बऱ्याचा गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे काही प्रमाणात खरेदी होत आहे.
असे असले तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मात्र विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 801 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आक्रमक वाढ करणार असले तरी अमेरीकेचे शेअर बाजार निर्देशांक वाढल्यानंतर आशियायी शेअर बाजार निर्देशांकातही वाढ झाल्याचे दिसून आले.