दिलीप वेंगसरकर यांनी केला गौप्यस्फोट
मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या 2008 साली झालेल्या मालिकेत नवोदीत असलेला विराट कोहली याला खेळविण्यासाठी निवड समिती त्याला संधी देणार होती, त्यावेळी तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी व बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अडथळा निर्माण केला असल्याचा गौप्यस्फोट माजी कसोटीपटू व तत्कालीन निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखालील युवा संघाने (19 वर्षांखालील) विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर कोहलीची मुख्य भारतीय संघात निवड करावी असे निवड समितीचे मत होते. मात्र, त्यावेळी त्याला यापूर्वी खेळताना प्रत्यक्ष पाहिलेले नाही, असे सांगत तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी व बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अडकाठी केली होती, असाही खुलासा वेंगसरकर यांनी केला.
2008 साली 23 वर्षांखालील संघाची निवड झाली होती. त्याचवेळी युवा संघाने कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वकरंडक जिंकला होता. तेव्हा त्यात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोहलीची निवड करण्यात आली होती. त्याचवेळी भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार होता. त्यावेळी संघाचे नेतृव धोनीकडे होते तर, प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू गॅरी कर्स्टन होते. त्यावेळी कोहलीला प्रत्यक्ष खेळताना आम्ही पाहिलेले नाही, त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यास त्यांनी विरोध केला होता.
मात्र, तुम्ही पाहिले नाही पण मी पाहिले आहे. त्याला संघात घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही मी सांगितले होते. श्रीनिवासन व धोनी यांचा कल एस. बद्रीनाथला निवड करण्याचा होता. देशांतर्गत स्पर्धेत त्याने सातत्याने धावा केल्या होत्या हे मलाही मान्य होते. श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपरकिंगकडून तो खेळायचा आणि त्याचे नेतृत्व धोनीकडेच होते त्यामुळे माझ्यावर त्यावेळी प्रचंड दबाव होता, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.