स्वच्छतेची काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा : अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल
– प्रकाश गायकर
पिंपरी – देशभरासह पिंपरी-चिंचवड शहर ही करोनामुळे “लॉकडाऊन’ झाले आहे. अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्यांची अडचण झाली आहे. या कठीण परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांसह अनेकांनी हात सरसावले आहेत.
गरजूंची मदत करण्याची आवश्यकता देखील तितकीच महत्त्वाची आहे. मात्र असे करत असताना संबंधित व्यक्तीने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवूनच मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक संस्था मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यांना महापालिकाही मदत करणार आहे. या कार्यामागील भाव जरी चांगला असला तरी जर थोडीसीही चूक झाली तर हा मदतीचा हात धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे स्वच्छता राखत व अंतर ठेवूनच मदत करण्यावर सर्वांनी भर द्यावा.
करोनामध्ये जवळपास सर्वच काम बंद असल्यामुळे मजुरांचे हाल होत आहेत. अनेक जणांना स्वतःच्या गावी जाण्याची सोय नाही. त्यामुळे शहरातच थांबावे लागत आहे. त्यामध्ये अनेकांना राहण्यासाठी घर नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. पोलीस देखील पुढाकार घेत आहेत. अन्नाची पाकिटे वाटणे, औषधे, सॅनिटायझर, मास्क अशा विविध सेवा पुरविण्यात येत आहेत. याशिवाय बरेचजण करोनाबाबत समुपदेशनही करत आहेत. मात्र अनेक ठिकाणची दृश्ये ही चिंता वाढवणारी आहेत. अगदी जवळ जाऊन अन्नधान्याची पाकिटे वाटतात. तसेच मदत करत असताना अनेकजण मास्क वापरत नसल्याने एकतर समोरच्याला किंवा मदत करणाऱ्यालाही संसर्ग होऊ शकतो.
मदत करताना ही घ्या काळजी
अन्नपदार्थ तयार करताना काळजी घ्या
हाताला ग्लोव्हज घालूनच पॅकींग करा
पॅकेजिंग मटेरियल चांगल्या दर्जाचे वापरा.
मास्क, सॅनिटायजर व्यवस्थित पॅक करून द्या
मदत करताना पुरेसे अंतर ठेवा
स्वच्छ पाण्याने अथवा सॅनिटायजरने हात धुवा.
गर्दी टाळणे आवश्यक
करोनाच्या संकटामध्ये गरजूंना मदत करण्यासाठी अनेक स्वंयसेवी संघटना पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मात्र काही ठिकाणी मदतीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. झोपटपट्टी भागामध्ये मदतीसाठी जाणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधीसमोर मोठी गर्दी केली जाते. इतर आपत्तीच्या वेळी ज्या पद्धतीने मदत केली जाते तशी मदत या संकटामध्ये करून चालणार नाही. ही गोष्ट नागरिकांसह मदत करणाऱ्यांनीही समजून घेतली पाहिजे.