येरवडा – येरवड्यात करोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती समजताच अफवांचे पेव फुटले आहे. 17 रुग्णांना करोनाचा प्रादूर्भाव झाला असून सर्वांनी खबरदारी घ्यावी, असा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात आला आहे. या चुकीच्या मेसेजमुळे येरवड्यासह संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून हाच चुकीचा मेसेज इतर अनेक ग्रुपवर लोकांनी खात्री न करतापुढे फॉरवर्ड केला आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत असून मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला. खात्रीपूर्वकच मेसेज फॉरवर्ड करावेत, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“जमात’च्या घटनेनंतर सर्व मेसेजची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, येरवडा परिसरातील सुमारे 20 ते 25 लोकांची तपासणी करण्यात आली असून एकाही व्यक्तीला करोनाची लागण झाली नसल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.