नवी दिल्ली – दिल्लीतील घटनेनंतर केजरीवाल यांची आज वडोदऱ्यात रॅली झाली. यावेळी त्यांनी सुरूवातीलाच जय श्रीरामचा नारा दिला. भाजपला लक्ष्य करताना ते म्हणाले की ते लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. मात्र मला त्याची फिकिर नाही. पण ते माझा द्वेष करत आहेत आणि त्या द्वेषामुळे ते एवढे अंध झाले आहेत की ते आता देवतांचाही अपमान करत आहेत.
दरम्यान, गुजतरातच्या काही भागात केजरीवाल यांचा फोटो असलेले पोस्टर झळकले होते. त्यात केजरीवाल यांनी मुस्लीम बांधव घालतात तशी टोपी डोक्यात घातली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, राम आणि कृष्ण यांना मी देव मानत नाही, असे गुजराथी भाषेत पोस्टरवर लिहिले होते. शुक्रवारी दिल्लीतील प्रकार व्हायरल झाल्यानंतर एका रात्रीत हे पोस्टर गुजरातमध्ये झळकले.
तसेच हिंदू धर्मातील रिवाजांना केजरीवाल मानत नाही असे सांगणारेही पोस्टर त्यासोबत झळकले. त्याला कारण ठरले आहेत केजरीवाल यांचे कॅबिनेट मंत्री गौतम. त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यात काही हिंदूंनी बौद्धधर्म स्वीकारला. मात्र, त्याचवेळी आम्ही राम आणि कृष्ण यांना देव मानत नाही अशी शपथही त्या कार्यक्रमात घेण्यात आली. आता तोच मुद्दा बनवून केजरीवालांच्या पक्षाला गुजरातमध्ये लक्ष्य केले जाणार हे उघड आहे. अहमदाबाद आणि राजकोट येथेही हे पोस्टर्स लागले आहेत व त्यात केजरीवालांची हिंदूविरोधी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
दरम्यान, आता वडोदऱ्यातील रॅलीत जय श्रीरामचा नारा देत त्यांनी आपण श्रीराम यांना मानत असल्याचे दाखवून दिले आहे.