मुंबई – कॉंग्रेसचे माजी मंत्री तथा नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री सुनील केदार यांना कॉंग्रेसच्या राज्य निवडणूक समन्वय समितीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधान आले आहे. आम्ही बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आहोत हे विधान केदार आणि वडेट्टीवारांना भोवले, अशी चर्चा कॉंग्रेसमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती ते पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी सुनील केदार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती. यामुळे यामागे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांच्यासह विजय वडेट्टीवार यांच्यातील शीत युद्ध तर नसावे ना अशी चर्चा कॉंग्रेसमध्ये रंगली आहे.
महाविकास आघाडीची आगामी वज्रमुठ सभा ही नागपुरात घेण्यात येणार आहे. या सभेच्या तयारीची जबाबदारी देखील माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर देण्यात आली आहे. मविआच्या सभेची जबाबदारी आणि जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा विजय मिळवून दिलेला असताना त्यांना समितीमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने कॉंग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अडबालेंमुळे राजकारण तापले
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा कुणाला द्यायचा, यावरून घोळ सुरू होता. अशा परिस्थितीत माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री आमदार विजय विजय वडेट्टीवार यांनी सुधाकर अडबाले यांना पाठिंबा घोषित करून टाकला. त्यानंतर कुणी पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा करीत असेल, तर ती पक्षाची भूमिका नाही, अशा आशयाचे वक्तव्य पटोलेंनी केले होते. यानंतर कॉंग्रेसचे विदर्भातील नेते नाना पटोले यांच्यासोबत नसल्याचे दिसून आले आहे.
समितीत यांची निवड
प्रदेश कॉंग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समिती स्थापन केली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे 17 सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. या सदस्यांमध्ये आमदार कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज आहेत.
तसेच आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजीत मन्हास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सावलखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे. यांचा समावेश करण्यासत आला आहे. यातील काही जणांनी आतापर्यत नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवली नसल्याचा काही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.