बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारामती एमआयडीसी सुरू करण्यासाठी कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर,जेजुरी व कुरकुंभ एमआयडीसी सुरू झाली असली तरी पुढील आदेश येईपर्यंत बारामती एमआयडीसी मात्र बंदच राहणार आहे.
बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात सात व्यक्ती कोरणा संक्रमित आढळल्या त्यामुळे बारामती शहर भिलवाडा पॅटर्ननुसार सील करण्यात आले आहे. बारामतीच्या औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक अशा चारशेहून अधिक कंपन्यांचे जाळे आहे. असे असले तरी लॉकडाऊन मुळे बारामतीची एमआयडीसी ठप्प झाली आहे.
लॉकडाऊन शिथील करत राज्यातील काही एमआयडीसी कंपन्या सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर ,जेजुरी व कुरकुंभ एमआयडीसीचा समावेश आहे. बारामती एमआयडीसी मात्र एमआयडीसीच्या पोर्टलवरून गायब आहे. बारामती एमआयडीसीतील कंपन्या सुरू करण्याची कोणतेही आदेश त्यामुळे प्राप्त झाले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या झोनमध्ये बारामती एमआयडीसीचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.
जीवनावश्यक तत्त्वानुसार बारामतीत डायनामिक्स डेअरी, कॅटलफिड तसेच इतर छोट्या-आठ ते दहा कंपन्या सुरू आहेत त्या सुरूच ठेवण्याचे आदेश नव्याने प्राप्त झाले आहेत. असे असले तरीदेखील कर्मचाऱ्यांचा तुटवडा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे त्या कंपन्यादेखील संथ गतीने सुरू आहेत. सुरू असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची योग्य खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीच्या परिसरातच कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. कंपनीच्या परिसरात कर्मचारी निवासाची सोय नसेल तर शासनाच्या आदेशानुसार कंपनीच्या वतीने बसेस द्वारे कर्मचाऱ्यांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. बस मध्ये एका आसनावरती एक असे केवळ तीस टक्के कर्मचारी प्रवास करू शकतात . कंपनीच्या परिसरात अथवा आवारात व्हेईकल नेण्यास सक्त बंदी करण्यात आले आहे. कंपनीच्या वतीने ने-आण करण्यासाठी असलेल्या बसला देखील जिल्हाधिकारी यांच्याकडून पासेस देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर ,जेजुरी व कुरकुभ एमआयडीसी सुरू झाली आहे .बारामती एमआयडीसी सुरू करण्याची कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत त्यामुळे बारामती एमआयडीसीतील जीवनावश्यक वगळता इतर सर्व कंपन्या बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बारामती एमआयडीसी कोणतीही कंपनी सुरू होणार नाही. सुरू असलेल्या कंपन्यांना देखील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, असे बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी संगितले.