बीड – सध्या पवित्र चैत्र महिना सुरु असून मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात हरिनाम सप्ताह सुरु आहेत. तसेच सध्या रमजान महिना देखील सुरु आहे. अशात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान सप्ताहाच्या मंडपात मुस्लिम बांधवांसाठी इप्तारची पंगत देण्यात आली. अंबाजोगाई तालुक्यातील या ग्रमास्थांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा गावात दरवर्षी उन्हाळ्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आणि यादरम्यान हा महिना पवित्र रमजानचा असल्याने मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र राहून कार्यक्रम साजरे करतात. दरवर्षी हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
दरम्यान, पाटोदा येथे रामनवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताहाचे आयोजन केले जाते. हे सप्ताहाचे २९ वे वर्ष आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादासाठी सर्व गावकरी सहभागी होतात. दरम्यान, गावातील मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना सुरु असल्याने इफ्तारच्या पंगतिचेही आयोजन ग्रामस्थांनी केले होते.