Good Friday 2023 – गुड फ्रायडे हा दिवस दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्व काय? हा दिवस ‘फ्रायडे’ म्हणजेच शुक्रवार या दिवशीच का साजरा केला जातो असे भरपूर प्रश्न तुम्हालाही पडत असतील ना? चला मग जाणून घेऊया या दिवसाचं महत्व…
गुड फ्रायडे हा दिवस ख्रिश्चन धर्मियांसाठी अतीशय महत्वाचा असतो. येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्तांची प्रार्थना करतात. गुड फ्रायडे नेहमी इस्टर संडेच्या (Easter Sunday) आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो.
या वर्षी आज, म्हणजेच 7 एप्रिललला गुड फ्रायडे साजरा करण्यात येत आहे. आजचा दिवस येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक कुठलाही आनंदाचा कार्यक्रम उपक्रम साजरा करत नसतात. या दिवशी सर्व खिस्ती लोक प्रभु येशु यांच्या बलिदानाकरीता कृतज्ञता तसेच आभार व्यक्त करत असतात.
येशू ख्रिस्तांनी जगाला प्रेम आणि करुणाचा संदेश दिला आहे. रोम राजाच्या एका आदेशानंतर येशूला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आले होते. त्या काळात अंधविश्वास आणि खोट्या समजूती पसरवणाऱ्या धर्मगुरुंचा सुळसुळाट झाला होता. अशा परिस्थितीत येशूने समाजाला योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येशूंच्या प्रसिद्धीत वाढ झाली.
येशूंचे कार्य हे अनेकांना पटणारे नव्हते. त्यांनी येशूंच्या विरोधात रोमच्या राजाला भडकावलं. त्यानंतर येशूला सुळावर लटकवण्याचा निर्णय रोमच्या राजाने घेतला. येशूने आपले सगळे जीवन समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, त्याला इस्टर संडे म्हटलं जातं, येशू पुन्हा जीवंत झाले आणि त्यापुढे 40 दिवस लोकांच्यात जाऊन त्यांनी संदेश दिला असं सांगितलं जाते. येशूंच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडेच्या रुपात साजरे केले जाते. या वर्षी 9 एप्रिलला इस्टर संडे साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशीही जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते.