नवी दिल्ली – सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलने करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याची आता फॅशनच सुरू झाली असून तीन कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्यांनीच देश सोडून पाकिस्तानात जावे असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी केले आहे.
देशाच्या अन्नदात्याला देशद्रोही ठरवणारेच खरे देशद्रोही असून त्यांनी प्रथम देश सोडून पाकिस्तानात जावे असे त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अशा लोकांना भारतात काहीहीं स्थान नाही असे ते म्हणाले.
राघव चढ्ढा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना दिल्ली प्रदेश भाजपचे प्रवक्ते विरेंद्र बब्बर यांनी म्हटले आहे की, जे पंतप्रधानांच्या हत्येची घोषणा देत आहेत त्यांच्या विषयी चढ्ढा यांचे मत काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. देशद्रोहाच्या आरोपाखाली ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या सुटकेची मागणी शेतकरी आंदोलनात कशी होऊ शकते असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर पलटवार करताना म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनेक कलाकार, लेखक, वकिल, व्यापारी इत्यादींनीही पाठिंबा दिला आहे ते सारे लोक देशद्रोही आहेत असे भाजपला म्हणायचे आहे काय हे त्यांनी स्पष्ट करावे.