नवी दिल्ली – करोना आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक आणि व्यापार विषयक परिस्थिती आणखी सुधारेल या दृष्टिकोनातून सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वाढले. परिणामी सोन्याच्या दरात घट चालूच आहे.
सोमवारी सोन्याचे दर 460 रुपयांनी कमी होऊन 48,371 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर ( Silver price today ) 629 रुपयांनी कमी होऊन 62,469 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर कमी होऊन 1,830 डॉलर प्रती औंस झाले. सोन्याचे दर ( gold price today ) तुलनेने कमी होत असल्यामुळे काही जण सोने खरेदीच्या विचारात आहेत.
सोन्याच्या दरात घट होत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक व्यापार आणि उद्योग सुधारण्याची लक्षणे असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्यातच रुपयाचे मुल्य आज 5 पैशांनी वाढले.
अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा व संभाव्य कोरोना विषाणू लसीच्या आशामुळे सोन्याचे आकर्षण कमी दिसून आले. परिणामी जोखिमीच्या गुंतवणूक मालमत्तेकडे बाजाराचा कल दिसून आला. तसेच बेस मेटल आणि कच्च्या तेलाच्या दरांनाही आधार मिळाला असल्याचे अँजेल ब्रोकिंगचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकी डॉलरची मजबूती आणि लसीची आशा वाढल्याने गुंतवणूकदारांची जोखिमीची भूक वाढत आहे. लसीबाबत सकारात्मकतेचे वातावरण असल्याने तेलाची मागणीही वाढली. त्याचबरोबर बेस मेटलचे दर वधारत आहेत. या समूहात निकेलने सर्वाधिक नफ्याची कामगिरी दर्शवली.