Buldana Lok Sabha Election 2024 – बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुटलेला असताना या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप विजयराज शिंदे यांनी केला आहे. दरम्यान हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटलेला असून येथून सलग तीन वेळा विजय मिळवणारे प्रतापराव जाधव चौथ्यांदा मैदानात उतरले आहेत.
बुलढाणा मतदारसंघातील बंड महायुतीची डोकेदुखी ठरत आहे. याआधी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी समजूत काढल्यानंतर देखील अजूनही गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अशातच आता भाजपाचे विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुती या बंडाला कशी समोरे जाते हे पाहणे महत्वाचे आहे.
प्रतापराव जाधव शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार –
एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या बुलडाणा मतदार संघात याआधी सलग तीनवेळा 2009, 2014 आणि 2019 मध्ये जाधव यांनी विजय मिळवला होता. यावेळी प्रतापराव जाधव यांना आपल्या महायुतीतीलच बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागतो की काय? अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.