मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कोश्यारी राजभवन येथे राज्यपाल पदाची शपथ घेतील.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग हे भगत सिंह कोश्यारी यांना पदाची शपथ देतील. सी. विद्यासागर राव यांची राज्यपालपदाची पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली. आता महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल म्हणून कोश्यारी उद्या शपथबद्ध होतील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर कोश्यारी यांचे आज प्रथमच मुंबईत आगमन झाले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कोश्यारी हे राजभवनात आले. तेथे त्यांना मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याला मंत्रिमंडळातील सदस्यांसह माजी राज्यपाल राम नाईक तसेच विविध पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी राज्यपाल विद्यासागर राव यांना मंगळवारी राजभवनावर राज्य शासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.