वेलिंग्टन : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गेली नऊ दशके खेळत असलेल्या न्यूझीलंड संघाने अखेर ९० वर्षानी कसोटीतील आपला १०० वा विजय साकार केला.
भारतीय संघाविरूध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १० गडी राखून जिंकताना न्यूझीलंडने या १०० व्या विजयाला गवसणी घातली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा सामना येत्या २९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
शंभर कसोटी जिंकणारा न्यूझीलंड संघ जागतिक क्रिकेटमधील ७ वा संघ बनला आहे. आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत या देशांनी १०० कसोटी सामने जिंकले आहेत.
सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे. आॅस्ट्रेलियाने ८३० सामने खेळताना ३९३ सामने जिंकले आहेत. भारताने १५७ सामन्यांत विजय मिळवला आहे.