सिडनी : T20 विश्वचषकाच्या 27 व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. (New Zealand beat Sri Lanka by 65 runs) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमावून 167 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावा केल्या. त्याचवेळी या टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणाऱ्या डॅरिल मिशेलने 22 धावा केल्या.
A big win for New Zealand to keep their net run rate soaring 😍#T20WorldCup | #NZvSL | 📝: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/gnlGWMNVCx
— ICC (@ICC) October 29, 2022
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 102 धावांत गारद झाला. श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. सातव्या षटकापर्यंत श्रीलंकेने 24 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. पथुम निसांका आणि धनंजय डी सिल्वा यांना खातेही उघडता आले नाही. कुसल मेंडिस चार धावा करून बाद झाला.
चारिथ अस्लंका चार आणि चमिका करुणारत्नेने तीन धावा करून बाद झाला. त्यानंतर भानुका राजपक्षेने कर्णधार दासुन शनाकासोबत सहाव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. राजपक्षे 22 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. राजपक्षेने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. वनिंदू हसरंगा चार आणि महेश टेकशाना शून्यावर बाद झाला. कर्णधार दासुन शनाका 32 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याचवेळी ईश सोधीने लाहिरू कुमाराला बाद करत श्रीलंकेचा डाव 102 धावांत गुंडाळला.
न्यूझीलंड संघाकडून ट्रेंट बोल्टने घातक गोलंदाजी करताना चार षटकांत 13 धावा देऊन चार बळी घेतले. त्याचवेळी मिचेल सँटनर आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.