#INDvPAk : पाकिस्तानचा भारताविरुद्ध थयथयाट

न्यूझीलंड व इंग्लंडने दौरा करण्यास नकार दिल्याने पित्त खवळले; बीसीसीआयने दबाव टाकल्याचा आरोप

लाहोर – सुरक्षेच्या कारणावरून न्यूझीलंड व इंग्लंड संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला. मात्र, त्यासाठी बीसीसीआय तसेच भारत सरकारला जबाबदार धरत पाकिस्तानातील एका मंत्र्याने भारताविरुद्ध थयथयाट केला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळणार होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने पाकिस्तानची नाचक्‍की झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणूनच आता पाकिस्तानकडे पाहिले जाते असून, या दोन देशांवर ही मालिका रद्द करण्यासाठी भारतानेच दबाव टाकल्याचा आरोप पाकिस्तानचे सूचना व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाला पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची धमकी भारतातून आली होती. तसेच ई-मेल हा भारतातून आला होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे. सिंगापूर स्थान दाखवणाऱ्या व्हीपीएनद्वारे भारतातून हा ई-मेल तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही धमकीची माहिती दिली, पण तपशील दिला नाही. या सगळ्या प्रकरणात भारताचाच हात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी 2009 साली मार्चमध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतरही कित्येक वर्षे न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानात मालिका खेळण्यास सातत्याने नकारच दिला होता. तरीही त्यांचे मंत्री आता भारतालाच जबाबदार धरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.