पुण्यातील रिक्षा चालकांसाठी ‘माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा’ स्पर्धा

पुणे – गंभीर गुन्ह्यात रिक्षाचालक सामील झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कर पोलिसांकडून माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  रिक्षा चालकांची प्रतिमा उंचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत विजयी ठरलेल्या रिक्षा चालकांना रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.

लष्कर पोलिसांकडून नवरात्रौत्सवात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांना बक्षीसे देण्यात येणार आहे, असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आदी याप्रसंगी उपस्थित होते.

माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा स्पर्धेचे आयोजन ७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. स्पर्धेत पहिला क्रमांक पटाकविणाऱ्या रिक्षा चालकास ११ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास ५ हजार रोख, तृतीय क्रमांकास ३ हजार रोख बक्षीस देण्यात येणार आहे तसेच प्रत्येकी एक हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना रिक्षा चालकांनी लष्कर पोलीस ठाण्यात ५ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.