फातोर्डा (गोवा) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात मुंबई सिटीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीके मोहन बागानचा 2-1 असा पराभव केला. अखेरच्या मिनिटाला बिपीन सिंग याने केलेला गोल निर्णायक ठरला.
साखळीत अव्वल क्रमांकाची ढाल आणि प्रथमच अंतिम फेरी गाठल्यानंतर जेतेपद अशी दुहेरी कामगिरी मुंबई सिटीने साकारली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर विजेतेपदाची लढत झाली. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती. एटीकेएमबीचे खाते 18 व्या मिनिटाला आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड विल्यम्सने उघडले. मुंबई सिटीला बरोबरी साधण्यात स्वयंगोलची साथ मिळाली.
एटीकेएमबीच्या बचाव फळीतील स्पेनचा खेळाडू टिरी याच्याकडून स्वयंगोल झाला. मुंबई सिटीकडून अखेरच्या मिनिटाला मध्य फळीतील मणीपूरच्या बिपीन सिंगने गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला.
चुरशीच्या प्रारंभानंतर एटीकेएमबीने सर्वप्रथम खाते उघडले. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला मुंबई सिटीचा बचावपटू मुर्तडा फॉल याने बचाव क्षेत्रात उडवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मध्यरक्षक अहमद जाहू याच्या दिशेने चेंडू मारला.
एटीकेएमबीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने दडपण आणल्यामुळे जाहूने चेंडूवरील ताबा गमावला. त्यामुळे चेंडू विल्यम्सच्या दिशेने गेला. तेव्हा विल्यम्स गोलक्षेत्रालगत होता. विल्यम्सने चेंडूवर नियंत्रण मिळवित चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारला. त्यावेळी मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग चकला. विल्यम्सने सलग तिसऱ्या सामन्यात गोल केला.