पुणे – पुणे जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. तेथे लसीकरण वाढविण्याकरिता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी नुकताच जिल्हानिहाय ऑनलाइन प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या सूचना
- करोना चाचण्यांची संख्या वाढवावी
- कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका
- घरोघरी जाऊन सर्व्हे करावा
- ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा दररोज आढावा घ्यावा
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
करोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी “मी जबाबदार’ ही जाणीवजागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. करोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून करोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.