नवी दिल्ली – डीपफेकबाबत सरकार नवीन नियम आणत आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज म्हणजेच १६ जानेवारीला डीपफेकवर २ बैठका घेतल्याचे सांगितले. चुकीची माहिती आणि डीपफेकबाबत नवीन आयटी नियमांमध्ये मोठ्या तरतुदी आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई केली जाईल. नवीन आयटी नियम ७-८ दिवसात अधिसूचित केले जातील.
यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका म्हणून समोर आला आहे’ असे म्हटले होते. केंद्रीय मंत्री म्हणाले की सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने डीपफेकचा धोका आणि त्याचे गांभीर्य स्वीकारले आहे. डीपफेकचे निर्माते आणि ते होस्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे वैष्णव म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डीपफेकवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा एक डीपफेक व्हिडिओ समोर आला होता. नुकताच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट या गेमिंग अॅपची जाहिरात करताना दाखवण्यात आला होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिकाचा चेहरा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एन्फ्लुएन्सरच्या चेहऱ्यावर सुबकपणे मॉर्फ करण्यात आला होता. सोशल मीडियावर हजारो लोकांनी रश्मिकाचा हा फेक व्हिडिओ खरा मानला कारण त्यात दिसणारे एक्सप्रेशन अगदी खरे वाटत होते. मात्र, ही महिला रश्मिका नसून झारा पटेल नावाची मुलगी होती, जिचा चेहरा बदलून रश्मिकाचा चेहरा त्यावर लावला होता.