नेवासा – धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गात तत्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी, एस.टी.जात प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच आदीवासींप्रमाणे सर्व सोयीसुविधा देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि.१६) रोजी सकाळी ११ वाजता नेवासा तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करुन मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सकल धनगर समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आरक्षण अंमलबजावणी बाबतीत दिवसेंदिवस आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाच्या भावना तिव्र झालेल्या आहेत. राज्यात धनगर समाज हा मेंढपाळ, अल्पभूधारक व भूमिहिन असून या धनगर समाजाची अर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने सांगून या भटक्या समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठीही मोठे हाल होत आहेत, राज्य घटनेत या समाजाची नोंद अनुसूचित जातीमध्ये असल्याचे सांगून आज पर्यंत सरकारने या समाजाला एस.टी जातीमध्ये समावेश केलेला नाही, सकल धनगर समाजाला वेळीच आरक्षण न दिल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात महेंद्र नजन, श्रीराम देशमुख, लक्ष्मण दाणे, पंकज लांभाते, दत्ताभाऊ कर्डूले, सानेश्वर खर्जुले, दत्तात्रय बनसोडे, सानेश्वर आयनर, कान्हूशेठ दाणे, आबासाहेब तोगे, बाबासाहेब भगत, शंकरराव नजन, अरुण नजन, दत्तात्रय नांगरे, ज्ञानेश्वर मिसाळ, सचिन देशमुख यांच्यासह सकल धनगर बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाकऱ्यांचे निवेदन नायब तहसिलदारांनी स्विकारुन आपल्या मागणीचा वरिष्ठपातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.