ई-कचरा संकलनासाठी नवी “पॉप अप संकलन योजना’

“स्वच्छ’ची मोहीम : नागरिकांच्या मदतीने ठराविक भागात ई-कचरा गोळा करणार 
पुणे –
शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या “स्वच्छ’ या संस्थेने आता “पॉपअप’ ही ई-कचरा संकलन योजना सुरू केली आहे. नागरिक आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांनी ही योजना राबवली आहे. ठिकठिकाणी अशाप्रकारचे संकलन आता केले जाणार आहे.

ई-कचरा आज जगभरात वेगाने वाढणारी समस्या असून, त्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारत दरवर्षी सुमारे 3 दशलक्ष टन ई-कचरा निर्माण होतो. ई-कचरा निर्मितीत भारत हा जगातला पाचव्या क्रमांकाचा देश आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवलेल्या नियमांनुसार या ई-कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही, तर ती पर्यावरणाला अत्यंत घातक ठरते. अनेकदा या कचऱ्याचे काय करायचे, याची विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात सर्वसामान्यांना माहितीही नसते. त्यामुळे ती माहिती असणेही आवश्‍यक झाले आहे.

इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याच्या निर्मितीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. “स्वच्छ’ मार्फत ई- कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. ई- कचऱ्याशिवाय जुने कपडे, खेळणी, वापरात नसलेल्या वस्तूंचे कलेक्‍शनही “स्वच्छ’मार्फत केले जाते. त्यातील काही गोष्टींचा पुनर्वापरही केला जाऊ शकतो.

ई-कचरा संकलनाची गरज लक्षात घेऊन, समाजात काम करणाऱ्या काही नागरिकांशी चर्चा करून महापालिकेच्या सहकार्याने “स्वच्छ’ ने महिन्यातून एकदा ई-कचरा आणि अन्य वस्तू गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला “पॉप अप’ असे नाव देण्यात आले आहे. महिन्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा ई-कचरा संकलित केला जाणार आहे. नागरिकांनी येथे नको असलेली खेळणी, पुस्तक घरगुती वापरातील नको असलेल्या वस्तू, ई-कचरा आणून द्यावा, असे आवाहन “स्वच्छ’ तर्फे करण्यात आले आहे.

यातील बऱ्याच वस्तूंचा दुरुस्त करून पुनर्वापर केला जाणार आहे. वास्तविक अशा प्रकारच्या वस्तू संकलनासाठी कायस्वरूपी जागा असावी असा मानस असल्याचे या संदर्भात औंध येथे काम करणाऱ्या मंगल गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.