कलंदर: नवे धोरण…

उत्तम पिंगळे

मी: नमस्कार सर, काय चाललंय?
विसरभोळे: थोडे पेपरातील भविष्य चाळत आहे. म्हणजे माझा विश्‍वास नाही; पण तरी उगाचच पाहात आहे.
मी: मला माहीत आहे. मग नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. तुमचे जेडीयू सरकारात सामील झाले नाहीत. तेवढा एक मिठाचा खडा पडला म्हणायचा.
विसरभोळे: अहो, त्यांना एकमात्र मंत्रीपदात स्वारस्य नव्हते.
मी: मग काय आता?
विसरभोळे: काही नाही, काहीतरी मध्यबिंदू निघेलही. असो नवीन सरकारने शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली आहे. तसेच शहीद जवान व पोलिसकर्मी यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीतही वाढ केली आहे. हे दोन चांगले निर्णय घेतले.

मी: हो, नव्या सरकारने हे पहिले निर्णय चांगले घेतले म्हणावयाचे.
विसरभोळे: पण सरकारला दीर्घ मुदतीचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मी अर्थशास्त्रचा प्राध्यापक असलो तरी मला पर्यावरण शास्त्रातही तेवढाच रस आहे.
मी: सर, तुम्हाला कशात रस नाही सांगा? कोणताही प्रश्‍न पडला तरी तुमच्याकडे उत्तर असतेच. पण तुम्हाला नेमके काय म्हणावयाचे आहे?
विसरभोळे: हे बघा, प्रधानमंत्र्यांनी शपथविधी वेळी “सबका साथ सबका विकास’ या निवडणूक नाऱ्याला “सबका विश्‍वास’ ही अशी जोड दिलेली आहे. म्हणजे कोणताही पक्षभेद न मानता एकूणच देशाच्या विकासासाठी कार्य करणार, असे यांनी अधोरेखित केले आहे.

मी: हो, बरोबर म्हणता आपण.
विसरभोळे: मागील वेळी प्रधानमंत्र्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते. सुरुवातीस लोकांनी तो चेष्टेचा विषय ठरवला; पण हळूहळू लोकांनाही ते पटू लागले. नाही म्हटले तरी पूर्वीपेक्षा स्वच्छतेच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे विरोधकही खासगीत मान्य करतात.
मी: मग पुढे काय करावे असे आपणास वाटत आहे?
विसरभोळे: आता स्वच्छ भारत तर पुढे नावे लागेल; पण पर्यावरणाच्या दृष्टीने “स्वच्छ भारत हरित भारत’ म्हणजे वृक्ष लागवडीस व त्यांच्या संवर्धनासाठी प्राधान्याने प्रोत्साहन द्यावे लागेल. वृक्षांचे महत्त्व तर आपण सर्वच जाणून आहोत. अगदी संतशिरोमणी तुकोबा महाराजांनीही “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ त्यावेळी सांगितले होते.आता आपण पाहतो की दिवसेंदिवस उष्मा किती वाढत चालला आहे. अशा वेळी माझ्या मते प्रथमत: सर्वत्र नदी किनारी वृक्ष लागवडीसाठी प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. तसेच नदीप्रदूषणही तपासणे आवश्‍यक आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड वाढवावी.

नवीन वृक्षांची मुळेही मग नदी काठच्या जुन्या वृक्षांच्या बाजूने पाणी घेण्यास सुरुवात करतील. पहिल्या टप्प्यात नदीच्या पात्रालगतच्या जमिनीत वृक्ष लागवड केली जावी. नंतर त्या वृक्षांच्या बाजूने लागवड केली जावी. तुम्ही पाहा हळूहळू फरक निश्‍चितच पडेल. मोठमोठ्या कंपन्यांनाही वृक्ष लागवड केली असता काही कर सवलत दिली जावी. तसेच स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेऊन वृक्ष लागवडीत सामावून घेतले जाणे आवश्‍यक आहे. पण वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ताबडतोब पाऊल टाकणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.