शहरातील 9 प्रभागात नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली 2099 झाडांना केली आळी
कराड – मलकापूर नगरपरिषदेने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन मोहीम राबवली. नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, विविध समितीचे सभापती, मुख्याधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी, स्वच्छता दूत यांनी यात सहभाग घेतला. या मोहिमेअंतर्गत 9 प्रभागातील नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली 2099 झाडांना व रोपांना आळी करणे, खत घालणे, ट्रि-गार्ड दुरुस्त करणे, पाणी घालणे आदी कामे करण्यात आली.
सकाळी लक्ष्मीनगर या ठिकाणी स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाअंतर्गत वृक्ष संवर्धनाची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी मंडळ अधिकारी ताकटे यांनी वृक्ष लागवड व संगोपन याबाबतचे मार्गदर्शन केले.
नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती दत्ता पवार, महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, उपसभापती कमल कुराडे, नगरसेवक प्रशांत चांदे, किशोर येडगे, अजित थोरात, नगरसेविका गितांजली पाटील, अलका जगदाळे, नंदा भोसले, पुजा चव्हाण, मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होते. ताकटे म्हणाले, दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढीमुळे होणारा विपरीत परिणाम यापासून सुटका होण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करणे आवश्यक आहे. मलकापूर नगरपरिषदेने यापुर्वीच हा उपक्रम हाती घेऊन पथदर्शी उपक्रम राबविला आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, नगरपरिषदेने दापोली कृषी विद्यापीठ व राजमंड्री आंध्रप्रदेश येथून चांगल्या प्रतीची वृक्ष रोपे लागवडीसाठी घेतलेली आहेत. शहरात प्रभागनिहाय वृक्ष संगोपनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संबंधित प्रभागातील नगरसेवक यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांच्यासोबत आरोग्य विभाग प्रमुख रमेश बागल, शहर समन्वयक पुंडलिक ढगे, कृषि विभाग नितीन पाचुंदकर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदरची मोहीम यशस्वी करण्यात आली.
मलकापूर नगरपरिषदेने वृक्ष संवर्धन कार्यक्रमाबरोबरच वृक्ष गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. लागवड केलेल्या वृक्ष, रोपांना स्वतंत्र रंग देऊन त्या झाडांवर नंबर टाकण्याचे नियोजित केले आहे. वृक्ष संगोपनासाठी 2 अधिकारी व प्रभाग निहाय कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहरामध्ये नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी 2000 खड्डे काढून तयार आहेत. सदर खड्ड्यांमध्ये 1 जुलैपासून वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.