नवीन सुवर्ण रोखे 11 जानेवारीपासून

सुवर्ण रोखतील सोन्याचा दर 5,104 रुपये प्रति ग्रॅम

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार सुवर्ण रोख्याच्या नव्या शृंखलेतील सुवर्ण रोखे 11 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत उपलब्ध होणार आहेत. या सुवर्ण रोख्यातील सोन्याचा दर प्रति ग्रॅमला 5,104 रुपये ठरविण्यात आला आहे.
सुवर्ण रोखे योजना 2020- 21 श्रंखला- 10 असे या सुवर्ण रोख्याच्या श्रंखलेचे नाव आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत असलेल्या सोन्याच्या दराचा आढावा घेऊन घेऊन या सुवर्ण रोख्यातील सोन्याची किंमत ठरविण्यात आली आहे.

रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार डिजिटल व्यवहाराला चालना देत आहे. त्यामुळे जर ग्राहकांनी सुवर्ण रोख्याची ऑनलाईन मागणी करून ऑनलाईन पेमेंट केले तर प्रती ग्रॅमला 50 रुपयाची सूट जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक हे सुवर्ण रोखे जारी करीत असते.

हे सुवर्ण रोखे एक ग्रॅमच्या टप्प्यात उपलब्ध असून रोख्याची मुदत आठ वर्षे आहे. मात्र ग्राहकांना पाच वर्षानंतर बाहेर पडता येते. हे सुवर्ण रोखे भारतीय नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना खरेदी करता येतात. व्यक्ती व अविभक्त हिंदु कुटुंबासाठी किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलोचे सुवर्ण रोखे खरेदी करता येतात. ट्रस्ट आणि इतरांना 20 किलो पर्यंतचे सुवर्ण रोखे खरेदी करता येतात.

बॅंका, होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया, काही पोस्ट कार्यालये आणि शेअर बाजाराकडून सुवर्ण रोखे खरेदी करता येतात. नागरिकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्यांना सोन्यात गुंतवणूक करता यावी, या दृष्टिकोनातून सुवर्ण रोखे योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 37 श्रंखलाच्या माध्यमातून 9,652 कोटी रुपयांचे ( 31 टन) सुवर्ण रोखे विकण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.