पुणे – शासनाच्या पंचवार्षिक आराखड्यात “डेटा सायन्स व सायबर सिक्युरिटी’ या विषयावर स्वतंत्रपणे नवीन महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयाकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.
केंद्र शासनाने ऑनलाईन बॅंकिंगला प्रोत्साहन दिले आहे. मात्र, सायबर सुरक्षेबाबत नागरिकांकडूनच नाही तर बॅंकांकडूनही आवश्यक दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येते. सायबर सुरक्षेबाबत जागृती व्हावी याबाबत विविध स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, विद्यापीठाने डेटा सायन्स व सायबर सुरक्षेबाबत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उमराणी यांनी सांगितले.
दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होणार
पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात बीएस्सी डेटा सायन्स आणि बीएस्सी सायबर सिक्युरिटी हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर या अभ्यासक्रम संदर्भात नवीन महाविद्यालयाला संलग्नता दिली जाणार आहे, असेही प्र-कुलगुरूंनी म्हटले आहे.