पिंपरी – विद्यार्थी आणि शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी एक नाविन्यपूर्ण वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे अनावरण केले असून या दिनदर्शिकेमुळे शाळांमध्ये सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे.
वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका ही महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी संपूर्ण वर्षभराचा आराखडा आहे. महापालिका शाळांमध्ये एकसमानता वाढवण्यासाठी आणि क्रियाकलाप सुव्यवस्थित करण्यासाठी या दिनदर्शिकेचा वापर केला जात असून संपूर्ण शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविणाऱ्या क्रीडाविषयक, सांस्कृतिक तसेच वैविध्यपुर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासही या दिनदर्शिकेमुळे मदत होत आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दिनदर्शिकेमुळे पालिकेच्या शाळांमध्ये सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळांना आगामी उपक्रमांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असून शिक्षकांवरील कामाचे ओझे कमी होऊन शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढविण्यासही मदत होत आहे.
दिनदर्शिकेमध्ये दप्तराविना शाळा, परीक्षांचे वेळापत्रक, शालेय सुट्ट्या, स्पर्धा, शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रशिक्षण वेळापत्रक तसेच भारतीय गुणवत्ता परिषद मुल्यांकन वेळापत्रक अशा अनेक उपक्रमांचा समावेश केला गेला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.