नेवासा – देवगाव (ता.नेवासा) येथे दुचाकीस्वराचे नियंत्रण सुटून झाडावर आणि घराच्या भिंतीवर धडकून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार (दि.१५) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहिती अशी की, फत्तेपूर येथील अरुण संताराम बर्डे हा युवक आपल्या दुचाकीवरून फत्तेपूरहुन – देवगावकडे यमाहा कंपनीच्या (क्रमांक एमएच.१७ डी.ए. १५६७) या दुचाकीवरून येत असतांना देवगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंडित वस्तीजवळ येताच मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला व घराच्या भिंतीला धडकली. यामध्ये अरुण संताराम बर्डे (वय २७) हा युवक झालेल्या अपघातात जागीच ठार झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. देवगाव – फत्तेपूर शिवारात राहत असलेल्या वस्तीवर मृत अरुण याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अरुण यास एक तीन वर्षाची मुलगी तसेच एक बारा दिवसाचा मुलगा असे दोन अपत्य आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक तुकाराम खेडकर करत आहेत. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.