Assembly by-elections in Maharashtra – देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी केली. या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. लोकसभेबरोबरच चार राज्यांत विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणुकही पार पडणार आहे. आजच्या घोषणेबरोबरच देशभर निवडणूक आचारसंहिताही लागू झाली आहे.
राज्यात अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील (Akola West Assembly Constituency) पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त होती. या पोटनिवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर निकाल हा 4 जून रोजी लागणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका असल्याने या मतदारसंघातील विधानसभेचा निकाल देखील देशभरातील लोकसभेच्या निकालासोबतच लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
आमदार गोवर्धन शर्मा यांचा निधन झाले होते. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेबरोबरच अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची देखील घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली.
देशातील सात टप्प्यांमध्ये किती मतदार संघात कसे मतदान
पहिला टप्पा – १९ एप्रिल – एकूण १०२ मतदार संघात मतदान
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – एकूण ८९ मतदार संघात मतदान
तिसरा टप्पा – ७ मे – एकूण ९४ मतदार संघात मतदान
चौथा टप्पा – १३ मे – एकूण ९६ मतदार संघात मतदान
पाचवा टप्पा – २० मे – एकूण ४९ मतदार संघात मतदान
सहावा टप्पा – २५ मे – एकूण ५७ मतदार संघात मतदान
सातवा टप्पा – १ जून – एकूण ५७ मतदार संघात मतदान
मतमोजणी – ४ जून २०२४
देशभरातील वयोगटानुसार मतदार संख्या
– नव मतदार – १ कोटी ८९ लाख
– १८ ते २१ वयोगट – २१ कोटी ५० लाख
– २१ ते २९ वयोगट – १९ कोटी ४७ लाख
– ८५ वर्षावरील वयोगट – ८३ लाख मतदार
– १०० वर्षावरील वयोगट – २ लाख १८ हजार
– तृतीयपंथीय – ४८ हजार
महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांत पाच टप्प्यांत होणार मतदान
आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांमध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. कोणत्या टप्प्यात कोणत्या मतदार संघात मतदान होणार आहे याची माहिती पुढील प्रमाणे.
पहिला टप्पा – १९ एप्रिल – गडचिरोली, भंडारा-गोंदीया, नागपुर, चंद्रपुर, रामटेक
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापुर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणंगले.
चौथा टप्पा – १३ मे – अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर.
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सर्व सहा मतदार संघ.