नेवासा (प्रतिनिधी) – वरखेड (ता. नेवासा) येथील महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त यात्रेकरूंना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याकामी गेल्या दोन महिन्यांपूर्वी मातंग समाजाने दिलेल्या निवेदनावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) दुपारी 12 वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथे सकल मातंग समाजातर्फे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व नामदेव चांदणे, रामभाऊ केंदळे, देवराम सरोदे, बाळासाहेब बागूल, हनिफभाई पठाण, प्रकाश तिजोरे, पोपट सरोदे, सुधीर वैरागर, दासूभाऊ आढागळे, बाबासाहेब शेलार, विजय वडागळे आदींनी केले.
या वेळी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार वेळेवर न आल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांच्या निषेधाच्या घोषणा देऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. मोर्चाप्रसंगी विविध मान्यवरांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन स्तरावर मातंग समाजातर्फे विविध मागण्यांचा पाठपुरावा केलेला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून, केवळ वरखेड देवस्थान मागासवर्गीय दलित समाजाचे आराध्य दैवत असल्याकारणाने याकडे वर्षानुवर्ष प्रशासन दुर्लक्ष करून जातिवाद करत असल्याचा आरोप निवेदनात करून रोष व्यक्त केला.
या वेळी मोर्चेकऱ्यांनी भाविकांना यात्रा साजरी करण्यासाठी मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून देऊन मंदिर परिसरातील एक किलोमीटरपर्यंतच्या शेतजमिनी आरक्षित करण्यात याव्यात व गावाच्या बाजूला असलेली मोठी जागा खुली करून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, फिरत्या दवाखान्याची व्यवस्था करावी. यात्रोत्सव काळात मंदिर परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी या वेळी केली. आंदोलनादरम्यान पोतराजांनी डफडे वाजवत यात्रेनिमित्त प्रशासनाने भाविकांना सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी केली.
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…
मोर्चेकऱ्यांचे निवेदन तहसीलदारांनी स्वीकारले. या वेळी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पो. कॉ. राजू केदार, महिला पोलीस हवालदार सविता उंदरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.आंदोलन सुमारे एक तास सुरू असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.