पुणे – टीम इंडियासाठी खेळणाऱ्या क्रिकेटर केदार जाधवचे वडिल महादेव सोपान जाधव (वय 75, रा. प्लॅट नं. 002, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
केदार जाधव हे कुटुंबियासह कोथरूड परिसरात राहावयास आहेत. त्याचे वडिल महादेव जाधव यांना डिमेंशिया हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबीय त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत.
दरम्यान, आज (दि. 27 मार्च) दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघून गेले आहेत.