ऍडलेड – साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलॅंडकडून 13 धावांनी दारुण पराभवाचा सामना (Netherlands defeat South Africa) करावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान संपुष्टात आले.
साखळी फेरी व सुपर 12 मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या दक्षिण आफ्रिकेवर विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की पुन्हा एकदा स्वीकारावी लागली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत नेदरलॅंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. स्टिफन मेबर्ग व मॅक्स ओद्वेड यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, मेबर्ग 30 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 37 तर ओद्वेड 31 चेंडूत 1 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 29 धावा करून बाद झाले. मार्क कूपरनेही आक्रमक फलंदाजी करत 19 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 2 षटकारांसह 35 धावांवर परतला.
WHAT A WIN! 🤩
Netherlands defeat South Africa in their final Group 2 match of #T20WorldCup#SAvNED |📝: https://t.co/4UJVijHlTA pic.twitter.com/zhmHSOpqVe
— ICC (@ICC) November 6, 2022
बास दी लीडेने साफ निराशा केली. मात्र, कॉलिन ऍकरमनने नाबाद 41 धावांची खेळी करताना स्कॉट एडवर्डसच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. ऍकरमनने आपल्या खेळीत 26 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. नेदरलॅंडचा डाव 20 षटकांत 4 बाद 158 असा रोखला गेला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 2 गडी बाद केले.
विजयासाठी 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 145 धावांवर रोखत नेदरलॅंडने सनसनाटी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे चार प्रमुख फलंदाज संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच बाद झाले. त्यानंतर डेव्हिड मिलर व वेन पारनेलने थोडी चमक दाखवली. मात्र, तरीही त्यांना विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही व त्यांचा डाव कोसळला व नेदरलॅंडने हा सामना 13 धावांनी जिंकला.
नेदरलॅंडचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असले तरीही त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत त्यांनाही आपल्यासह स्पर्धेबाहेर काढले. नेदरलॅंडकडून ब्रेंडन ग्लोवरने 3, तर फ्रेड क्लासेन व बास दी लीडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
नेदरलॅंड – 20 षटकांत 4 बाद 158 धावा. (स्टिफन मेबर्ग 37, मार्क कूपर 35, मॅक्स ओद्वेड 29, कॉलिन ऍकरमन नाबाद 41, स्कॉट एडवर्डस नाबाद 12, केशव महाराज 2-27). दक्षिण आफ्रिका – 20 षटकांत 8 बाद 145 धावा. (रेली रोसो 25, हेनरीच क्लासेन 21, टेम्बा बवुमा 20, ब्रेंडन ग्लोवर 3-9, फ्रेड क्लासेन 2-20, बास दी लीडे 2-25).