पुणे – विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी. अनिवार्य नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले. त्यामुळे प्राध्यापकांसाठी पीएच.डी.च्या निकषावरील संभ्रम दूर झाला आहे.
सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी “नेट’ पात्रता पुरेशी असणार आहे. आता नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या संकुलात नव्याने बांधलेल्या “यूजीसी-एचआरडीसी’च्या इमारतीच्या उद्घाटन जगदेश कुमार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी संवाद साधताना आता यापुढे सहायक प्राध्यापकांसाठी पीएच.डी.च सक्ती नसणार असल्याचे जाहीर केले. तसेच, एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल विकसित केले जात आहे. ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यापूर्वी विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी पीएचडी पदवी अनिवार्य होती. त्यामुळे सेट-नेट उत्तीर्ण होऊनही विद्यापीठांत अध्यापकांची संधी मिळत नव्हती. पीएचडी पदवीची सक्ती असल्यामुळे विद्यापीठात अनेक पद रिक्त राहत होती. त्या पार्श्वभूमीवर पीएचडीची अट रद्द करावी, अशी मागणी नेट पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून होत होती. आता पीएचडीची पदवीचे निकष काढून टाकण्यात आल्यामुळे विद्यापीठात रिक्त पदावर प्राध्यापकांची भरती शक्य होईल.