पुणे -जगातील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही हिंदी, पंजाबी, बंगाली मराठी अशा अनेक भाषांची जननी मानली जाते. तिला “देवभाषा’ असेही म्हणतात. पुराणातील बहुतेक ग्रंथ संस्कृत भाषेतच आहेत. ही भाषा पुन्हा एकदा तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करत आहे. आता संशोधन ते अध्यापनापर्यंतची अनेक कामे या भाषेत होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी करिअर म्हणून ही भाषा निवडत आहेत. ही भाषा अवगत झाल्यानंतर नोकरीसाठी भटकावे लागत नाही. तर, संस्कृतचे ज्ञान, संशोधन, भाषांतर आणि अध्यापनापासून ते धार्मिक विधी करून आर्थिक उत्पन्न मिळवता येते.
अनेक विद्यापीठांचे पर्याय
जर तुम्हाला संस्कृतीचे पारंपारिक शिक्षण घ्यायचे असेल, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दिल्लीस्थित राष्ट्रीय संस्कृत संस्था, बनारसस्थित संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, दिल्लीस्थित श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, बिहारस्थित कामेश्वरसिंग दरभंगा संस्कृत विद्यापीठ आणि बिहार येथे प्रवेश घेता येईल. आंध्र प्रदेशस्थित तिरुपती संस्कृत विद्यापीठात प्रवेश घेता येईल. याशिवाय जेएनयू आणि पाटणा विद्यापीठ, बनारसचे बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
करिअरची व्याप्ती
संस्कृत भाषा ही सामान्य भाषा नाही. ही भाषा देशाबरोबरच परदेशातूनही प्रसिद्ध आहे. भारतातील सुमारे 15 विद्यापीठांमध्ये संस्कृतचे शिक्षण दिले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत भाषेला जगातील सर्वांत जुनी भाषा होण्याचा मान आहे. परदेशांतील 250 हून अधिक विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जात आहे. पुरेसे शिक्षण घेतल्यानंतर संस्कार करण्यासोबतच भाषांतरकार, लेखक, शिक्षक म्हणूनही करिअर करू शकता.
अभ्यासक्रम आणि पात्रता
संस्कृतमध्ये स्वारस्य असेल, तर हे एक उत्तम करिअर ठरते. आजच्या काळात विद्यार्थ्यांना पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण घेता येते. संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी बारावीची परीक्षा संस्कृत विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पुढे संस्कृत विषयात स्पेशलायझेशनसह बॅचलर ऑफ आर्टस आणि इतर डिप्लोमा कोर्स करता येतो. ग्रॅज्युएशननंतर एम.ए. देखील करता येते. तुम्हाला संस्कृतमध्ये डॉक्टरेट पदवी घ्यायची असेल तर तुम्ही पीएच.डी. ही करू शकता. ज्यांना संस्कृतचे ज्ञान आहे ते यूजीसी नेट उत्तीर्ण होऊन संस्कृतमध्ये संशोधन करू शकतात. याशिवाय संस्कृत साहित्याशी संबंधित अल्पकालीन अभ्यासक्रमही विविध विद्यापीठांत उपलब्ध आहेत.