नवी दिल्ली : तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमधील निर्भया प्रकरणात तपासात हलगर्जीपणा केलाच आहे, अशा शब्दात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना फटकारले. दरम्यान, दिल्लीतील एका युवतीने या प्रकरणात पोलिसाच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ आंदोलन केले.
शर्मा म्हणाल्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने हैदराबादमधील निर्भयाच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितले की, हैदराबाद पोलिसांनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. त्यांनी खूप वेळ वाया घालवला. त्यांच्या कुटुंबियांचे न ऐकल्यानेच त्यांनी बहुमोल असा वेळ वाया घालवला. तरीही मंत्री म्हणतात, ही निर्भया शिकलेली होती तिने त्यांच्या कुटुंबियांऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता.
दरम्यान, हैदराबाद येथील या निर्भयाच्या हत्याकांडानंतर पोलिसांनी केलेल्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ दिल्लीत एका युवतीने संसदेच्या प्रवेशद्वारा जवळ मला माझ्याच देशात का सुरक्षित वाटत नाही?, असा फलक घेऊन मूक आक्रोश केला. त्यानंतर या युवतीला पोलिसांनी तेथून उठून जंतर मंतरवर जाऊन निदर्शने करण्याची विनंती केली. या युवतीचे नाव अनु दुबे असे आहे. मात्र तिने पोलिसांची विनंती फेटळली. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिला संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेऊन काहीवेळ चौकशी करून तिला सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या युवतीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल म्हणाल्या. आंदोलन स्थळावरून तिला उचलून मारहाण करण्याची कृती केवळ निषेधार्ह नाही तर या पोलिसांवर करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.