अॅडलेड : अॅडलेड येथे सुरू असलेल्या दुस-या आॅस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटीत दुस-या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. आॅस्ट्रेलियाने वाॅर्नरच्या त्रिशतकी आणि लबुशेनच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव ३ बाद ५८९ वर घोषित केला. धावांचा हा डोंगर पाहून दबावात अालेल्या पाकच्या फलंदाजांची त्रेधा उडाली. दुस-या दिवसअखेर पाकची ६ बाद ९६ अशी बिकट अवस्था झाली असून पाक अजूनही ४९३ धावांनी पिछाडीवर आहे.
Another outstanding day for Australia 💪
Pakistan are 96/6 at stumps, after Australia declared on 589/3 earlier in the day, David Warner scoring 335* 👏 #AUSvPAK pic.twitter.com/9VHVlt0hcV
— ICC (@ICC) November 30, 2019
आॅस्ट्रेलियाच्या ५८९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकच्या पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली . मिशेल स्टार्कच्या भेदक मा-यासमोर पाकच्या फलंदाजाची चांगलीच दाणादाण उडताना दिसली. पाकची धावसंख्या ३ असताना स्टार्कने डेव्हिड वाॅर्नरकरवी इमाम-उल-हकला २ धावांवर झेलबाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी ठराविक अंतराच्या धावसंख्येवर अजहर अली ०९, शान मसूद १९, असद शफीफ ०९, इफ्तिखार अहमद १० आणि मोहम्मद रिजवानला शून्यावर बाद करत एकामागे एक धक्के दिले.
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिशेल स्टार्कने सर्वाधिक ४ तर पॅट कमिन्स आणि हेझलवूडने प्रत्येकी १ गडी बाद केला. दुस-या दिवसांचा खेळ थाबंला तेव्हा पाकची ६ बाद ९६ अशी अवस्था झाली असून यासिर शाह नाबाद ०४ तर बाबर आझम नाबाद ४३ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. सलामीवीर जो बर्न्स केवळ ४ धावा करत माघारी परतला. त्याला शाहीन अफरीदीने मोहम्मद रिजवानकरवी झेलबाद केले.त्यानंतर लबुशेनच्या साथीने वाॅर्नरने संघाची धुरा संभाळात पाक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. दुस-या विकेटसाठी दोघांनी ३६१ धावांची दमदार भागीदारी केली. लबुशेन १६२ धावांवर खेळत असताना शाहीन अफरीदीने त्याला त्रिफळाचित केलं. लबुशेनने २३८ चेंडूत १६२ धावांच्या खेळीत २२ चौकार लगावले.
त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि वाॅर्नर संघाचा डाव सावरला. वाॅर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं त्रिशतक झळकावलं. वाॅर्नरने ४१८ चेंडूत ३९ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३५ धावा केल्या.
वाॅर्नरने तिस-या विकेटसाठी स्मिथसोबत १२१ आणि मॅथ्यूसोबत ९९ धावांची भागिदारी रचली. मॅथ्यू वेडने ४० चेडूंत ३८ धावा केल्या. अखेरीस आॅस्ट्रेलियाने ५८९ वर पहिला डाव घोषित केला. पाककडून शाहीन अफरीदी या एकमेव गोलंदाजानी ३ गडी बाद केले. अफरीदी वगळता अन्य गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आले.