मुंबई – आता मला बघायचं आहे की महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्यांचा महिला सन्मानाबाबत गेल्या आठ दिवसांपासून गदारोळ चालला होता आता त्यांच्या पक्षाच्या नेत्याने अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे तर त्यांची भूमिका काय आहे. आता त्यांना तुम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही का? आता आंदोलनं करणार आहात का? फोटोवर चपला हाणून आंदोलन करणार आहात का? असा प्रश्न भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राजन पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केल्यानंतर विचारला आहे.
दरम्यान, खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.