नीलकंठ मोहिते
इंदापूर – मागील दोन वर्षांपासून सातत्याने इंदापूरमधील भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या फळीतील नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दि. 3 एप्रिल रोजी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची लाखेवाडी येथील जाहीर कार्यक्रमासाठी वेळ घेतली आहे. बावडा जिल्हा परिषद गटाचे, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासू श्रीमंत ढोले यांच्यासह अनेक दिग्गजांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याने इंदापूर तालुक्यातील भाजपच्या गडाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सुरुंग लागल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.
मागील दोन विधानसभा सलग सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करत केवळ सामान्य जनतेच्या जीवावर आमदारकी मिळवली. यावेळच्या विधानसभेला तर, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर सोडून एकही बलाढ्य सहकारी मदतीला नसताना केवळ तालुक्यातील उपेक्षित घटक, सामान्य जनतेच्या जीवावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राज्यमंत्री भरणे यांनी रोखले.
तालुक्यातील अनेक दिग्गज पुढाऱ्यांना, राज्यमंत्री भरणे तालुक्याच्या राजकारणात टिकणार का? असा अंदाज मनापासून आला नाही. त्यामुळे अनेकांनी विधानसभा कालावधीमध्ये राज्यमंत्री भरणे यांची साथ सोडली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार व शरयू फाऊंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी खंबीर पाठबळ देऊन साथ दिली. सरकार
नसतानादेखील तालुक्यात विकासाची गंगा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोहोचविल्याने राज्यमंत्री भरणे यांची क्रेझ दोन पंचवार्षिकला कायम राहिली. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेसाठी मूलभूत गरजा असणाऱ्या विकासकामांकडे कायमचे लक्ष दिल्यामुळे गावोगावी रस्ते, वीज, मुबलक पाणी निर्माण झाले आहे.
बावडा भागातील लोकसंग्रह अधिकचा असणारे भाजपचे श्रीमंत ढोले राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी, राष्ट्रवादी कॉंग्रेसची यशस्वी खेळी पक्षाला साधता आली आहे. बावडा परिसरामध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे व सामाजिक कामातून दरारा निर्माण केलेले ढोले राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी वरदान ठरणार आहेत.
नगरपालिका, जि. प, पंचायत समिती टार्गेट
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सध्या इंदापूर नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी टार्गेट करीत आगामी निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामध्ये अनेक भाजपचे दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हातात घेणार आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या या नव्या खेळीला कसे रोखणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.