चाचणीशिवाय रस्ते कॉंक्रिट नाही – आयुक्त राजेश पाटील यांचे धोरण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते कॉंक्रीट केले जातात. मात्र अनेकदा डांबरी रस्ते सुस्थितीमध्ये असतानाही ते खोदून त्यावर सिमेंट कॉंक्रीट केले जाते. यामुळे विनाकारण खर्च होतो. मात्र आता शहरातील डांबरी रस्त्यांची फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट केले जाणार नाहीत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरामध्ये 1223.54 किमी लांबीचे डांबरी रस्ते व 977.07 किमी लांबीचे सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आहेत. सध्यस्थितीमध्ये अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आयुष्य किती उरले आहे. याचे विश्लेषण करण्यासाठी फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर या पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. कमीतकमी 10 वर्ष पूर्ण झालेल्या डांबरी रस्त्यांसाठी ही चाचणी करण्यात येणार आहे.
फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेऊ नये, तसेच कामांना तांत्रिक मान्यता देताना चाचणीच्या अहवालानुसार येणाऱ्या आच्छादनाच्या थराच्या जाडीची शहानिशा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत. गावठाण परिसरात गर्दी, रहदारी असते जेथे रस्ते करणे शक्य होत नाही, त्या ठिकाणी रस्ते कॉंक्रिट करण्यास प्राधान्य दिले जाते.
चाचणीचे फायदे
डांबरी रस्त्यावर ही चाचणी केल्यावर त्याचे आयुष्य किती उरले आहे. तसेच रस्ता पूर्ववत करण्यासाठी किती जाडीचा डांबरी थर टाकावा लागेल याबाबत माहिती मिळणार आहे. जर रस्त्याचे उर्वरित आयुष्य कमीत कमी 60 टक्के असेल तर डांबरीकरणाचे आच्छादन करून कमी खर्चामध्ये सध्यस्थितीतील रस्त्याचे आयुष्य पुन्हा वाढू शकेल. डांबरी रस्त्याचे उर्वरित आयुष्य 15 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास, डांबरीकरणाच्या आच्छादनासाठी येणारा खर्च व नव्याने कॉंक्रीटीकरणाचा खर्च यांची तुलना करून रस्ता संपूर्णपणे कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेता येणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
कॉंक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी साधारणपणे डांबरी रस्त्यापेक्षा 30 टक्के इतका अधिक खर्च येतो. तसेच कॉंक्रिट रस्ता तयार केल्यानंतर त्या रस्त्यावर खोदाई करणे त्रासदायक व खर्चिक असते. त्यामुळे फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर द्वारे चाचणी करून निर्णय घेणे महत्वाचे आहे. आयआरसी – 115-2014 च्या मानांकनानुसार चाचणी मान्यताप्राप्त व विश्वसनीय आहे.
– राजेश पाटील, आयुक्त.