अनिल देशमुखांचा बचाव करण्यात राष्ट्रवादीला अपयश; शरद पवार पक्षातील नेत्यांवर नाराज ?

मुंबई – परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर शरद पवार प्रचंड नाराज असल्याचा दावा काही बातम्यांमधून सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांची बाजू व्यवस्थितपणे मांडली नाही. परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा डागाळली. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत, असा दावा या बातम्यांमधून करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. परमबीर सिंह यांनी आयुक्तपद गेल्यानंतर सचिन वाझेंच्या हवाल्याने काही आरोप केले होते. त्यात देशमुख हेच केंद्रस्थानी होते. राज्याच्या गृहमंत्र्यांवरच थेट आरोप झाल्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात खळबळ उडाली. मात्र या प्रकरणातल्या तोपर्यंत समोर आलेल्या सगळ्याच गोष्टी संशयास्पद असल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, शरद पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेता असा मुद्देसूद प्रतिवाद करु शकला नव्हता. त्यामुळे शरद पवार नेत्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे समजते.

तर दुसरीकडे शरद पवार हे अद्याप अनिल देशमुख यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांनी न घाबरता सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.