अबब !! करोना रूग्णांचा आजचा आकडा दीड लाखांच्या जवळ; रूग्णालये पडतायत अपुरे

नवी दिल्ली  – देशात करोना महामारीने हाहाकार माजवला असून रूग्णांच्या संख्येत रोज प्रचंड भर पडत आहे. ही संख्या दिवसागणिक वाढताना दिसून गेल्या 24 तासांत देशात करोनाचे नवे 1 लाख 45 हजार 384 रूग्ण आढळून आले आहेत. आता देशातील करोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या 10 लाखांच्यावर गेली असून देशभरातील एकूण करोना बाधितांची संख्या आता 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 इतकी झाली आहे.

बाजारात औषधांचा तुटवडा, लसीकरणाचे देशभर विस्कळीत झालेले सत्र, रूग्णालयाची अपुरी पडू लागलेली व्यवस्था, या साऱ्यांमुळे देशभर भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. तथापि उपाययोजनांच्या बाबतीत मात्र केंद्रीय पातळीवरून प्रचंड ढिलाई आणि चालढकलच सुरू असल्याचा आरोप सुरू आहे. रोज हजारोंच्या संख्येने करोनाचे रूग्ण आढळून येत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा कशी उभी करायची असा प्रश्‍न राज्य सरकारांपुढे निर्माण झाला आहे. गुजरात सारख्या राज्यांतही रूग्णालये अपुरी पडू लागल्याच्या बातम्या आल्या असून रूग्णांना हॉस्पिटलच्या बाहेरच उपचार करावे लागत असल्याचे व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत होत आहेत.

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 794 इतकी झाली असून त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता 1 लाख 68 हजार 436 इतका झाला आहे. करोनाच्या गंभीर रूग्णांवर रेमडेसेविर औषधांचा चांगला परिणाम दिसून येत असल्याने त्याची देशभरातील मागणी वाढली असली तरी या औषधांचाहीं देशभर तुटवडा निर्माण झाला आहे.

या औषधांची नेमकी गरज किती आहे, त्याच्या उपलब्धतेसाठी काय उपाययोजना केली जात आहे, ही गरज नेमकी कधी पुर्ण होणार आहे याची माहिती केंद्रीय पातळीवरूनही दिली जात नसल्याने अधिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ, राजस्थान, पंजाब, ओडिशा या राज्यांमध्यही लसी अभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत. ओडिशात लसी अभावी सातशे लसीकरण केंद्रे बंद करावी लागली असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. उत्तरप्रदेशातही अनेक रूग्णालयांच्या बाहेर लस शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आल्याचे व्हिडीओ प्रसारीत होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.