मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून पक्षाच्या जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, आतापासूनच तयारीला लागा असे आदेश दिल्याचे समजते.
‘एकहाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा’, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी मागील 30-35 वर्षांपासून ऐकतो आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे. त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नाही,” असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने केलेली कामे सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असेही आदेश दिले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावर तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.