सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा; कोविडरुग्ण कमी झाल्याचा परिणाम पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालय करण्यात आले होते. मात्र सध्या शहरातील कोविडबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी वायसीएम खुले करण्याबाबत येत्या रविवारी (दि.1) अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. वायसीएम खुले झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरात कोविडच्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात वाढू लागल्यानंतर वायसीएम हे रुग्णालय कोविडच्या रुग्णांसाठी पूर्णपणे राखीव करण्यात आले होते. याठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात सुविधा देण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरातील कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. तसेच महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे कोविड रुग्णांसाठी दोनशे बेडचे स्वतंत्र रुग्णालयही उभारले आहे. याशिवाय शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार बेडची व्यवस्थाही केल्यामुळे वायसीएम सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करता येणे शक्य आहे. वायसीएम रुग्णालयातील कोविड बाधितांची संख्याही वीस ते तीस टक्क्यांवर आल्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करावी, अशी मागणी करण्यात येत होती. घटलेली रुग्णसंख्या आणि वाढती मागणी याचा विचार करून येत्या रविवारी (दि.1) वायसीएम सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. “वायसीएम’मध्ये पोस्ट कोविड सेंटर करोनामधून रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये अनेक करोनाची लक्षणे आढळून येत आहेत. करोनामुक्तीनंतर घ्यावयाची काळजी व त्यानंतचे उपचार याबाबत महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच वायसीएम रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे.