मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवर आपले मत व्यक्त करताना केंद्र सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
आज मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची प्रचंड दरवाढ केली आहे. 50 रूपयांनी सिलिंडर महाग झाले आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत 140 डॉलर प्रती बॅरल इतकी झाली. पण काल परवा आलेल्या बातम्या पाहिल्या तर भारत सरकारने रशियासोबत करार करून अतिशय स्वस्त दरामध्ये कच्चे तेल आयात केले आहे, असे त्यांनी सांगितले.
एकीकडे लोकांना सांगायचं की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे आणि दुसरीकडे रशियाकडून अतिशय कमी दरात कच्चे तेल आयात करूनही दरवाढ जाहीर करायची. मोदी सरकारकडून भारतीय जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आज केलेली गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावीत, अशी मागणी प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.