नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. अखिलेश यांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये आझमगडमधून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते.
अखिलेश यांच्यासह पक्षाचे नेते आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून पहिल्यांदाच नशीब आजमावले होते. आता त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभेत आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिलेश यादव यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा 67 हजार 504 मतांच्या फरकाने पराभव केला होता. अखिलेश यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना उमेदवारी दिली होती. करहाल ही जागा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानली जाते.
Samajwadi Party (SP) chief Akhilesh Yadav to resign from Lok Sabha membership today: Sources
In the recently held Uttar Pradesh elections, he was elected as an MLA from the Karhal seat. pic.twitter.com/6ARrBpG9Ga
— ANI (@ANI) March 22, 2022
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने ही निवडणूक लढवली होती. आता उत्तर प्रदेशात सपा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे. योगी आदित्यनाथ यांना आव्हान देण्यासाठी सपाने जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल, ओम प्रकाश राजभर यांच्या सुहेलदव भारतीय समाज पक्षासोबत युती केली होती. पण 2012 च्या विजयाची पुनरावृत्ती करण्यात अखिलेश यादव यांना यश आले नाही.