अजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी

पिंपरी – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राजकीय घडामोडींना आत वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांची मते जाणून घेतली. माजी आमदार विलास लांडे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून (दि. 21) लागू होण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छूक आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत अजित पवार यांनी बैठक बोलवली होती. पुण्यात झालेल्या बैठकीस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, राजेंद्र जगताप, पंडीत गवळी, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार यांनी प्रत्येकाकडून निवडणुकीच्या स्टॅटेजीविषयी मते जाणून घेतली. इच्छुकांशी संवाद साधला. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात, अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. निरोप देवूनही या बैठकीला माजी आमदार विलास लांडे यांनी गैरहजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीलाही लांडे यांनी गैरहजेरी लावली होती. त्याबाबतही अजित पवार यांनी या बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे समजते.

दरम्यान, अजित पवार उद्या दुपारी चार वाजता काळेवाडी येथील बालाजी मंगल कार्यालयात मेळावा घेणार असून, त्यात प्रचाराचा श्री गणेशा करणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here