दीर्घकाळासाठी भूखंडात गुंतवणूक करा

गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. रिअल इस्टेट, सोने-चांदी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कर्जरोखे आदी ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. परताव्याचे प्रमाण सेक्‍टरनिहाय वेगवेगळे आहे. शेअर बाजारात दोलायमान स्थिती राहत असल्याने या ठिकाणी दिर्घकाळ टिकून राहणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत मालमत्तेतील गुंतवणूक ही तुलनेने अधिक फायद्याची राहिली आहे. मालमत्तेत गुंतवणूक करताना राहण्याचाच विचार होतो असे नाही, काही वेळा फायदा कमावण्यासाठी देखील पैसा गुंतवला जातो. गेल्या काही वर्षात रिअल इस्टेटमध्ये युवकांचा कल वाढत चालला आहे. वाढते वेतनमान हे यामागचे प्रमुख कारण आहे. मालमत्तेतील गुंतवणूक ही नेहमीच फायद्याचा सौदा ठरली आहे. मालमत्तेतील दीर्घकाळासाठीची गुुंतवणूक ही बंपर परतावा देणारी ठरू शकते. या कारणामुळे या सेक्‍टरमध्ये किमान पाच ते दहा वर्षानंतरच परताव्याचा विचार करायला हवा.

लक्षात ठेवा
कोणत्याही भागात आणि कोठेही जमीन, भूखंड खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात घेणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीच्या कायदेशीर बाजू तपासल्यानंतरच संबंधित जमीन खरेदीचा विचार करायला हवा. आपला पैसा सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कमी किंमतीतील भूखंड खरेदी करून भविष्यात पश्‍चातापाची वेळ येणार नाही,याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. एखाद्या हौसिंग स्किमलगत जमीन खरेदी करायची असेल तर अतिरिक्‍त सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. कारण हौसिंग स्किमशी निगडीत अनेक नियम आणि कायद्याचे पालन करावे लागते.

स्थानांना विशेष महत्त्व: सध्या विविध माध्यमातून मोकळ्या भूखंडाच्या जाहिराती विपूल प्रमाणात येतात. याशिवाय भूखंड विक्रीचे भित्तीपत्रकही पाहण्यात येतात. अशावेळी भावनेच्या भरात भूखंड खरेदीचा विचार करु नये. जमीन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या लोकेशन, स्थानांना महत्त्व द्या. खरेदी करण्यात येणारी जमीन सखल भागात तर नाही ना, याचा विचार करा. कारण पावसाळ्यात या भागात पाणी साठू शकते. तसेच भूखंड आणि मुख्य रस्ता यातील अंतर कमीच असावे. भूखंडाचा परिसर, विकासकामे, पर्यटनस्थळ, वीज-पाणी सोयसुविधा याचेही आकलन करायला हवे. फोटोवरून भूखंड खरेदीचा निर्णय घेऊ नका. प्रत्यक्षात पाहणी करुनच त्याच्या खरेदीचा विचार करायला हवा.

कर आणि नियमांचे आकलन: कोणत्याही प्रकारची जमीन, भूखंड खरेदी करताना सरकारचा कर भरावाच लागतो. त्यामुळे प्लॉट खरेदी करण्यापूर्वी नियम आणि करांचे आकलन करायला हवे. खरेदी करताना कोणकोणत्या करांचा भरणा करावा लागेल, याची माहिती रजिस्ट्रार ऑफिस, तलाठी कार्यालय, जागा मालक याकडून घ्यावी. शेतजमीन खरेदीचा सौदा फायद्याचा ठरू शकतो. कारण या जमीनी कमी किंमतीत मिळू शकतात. मात्र त्यावर कर भरावे लागतात.

तत्पूर्वी स्थानिक प्रशासनाकडून कराची माहिती घ्यावी. या जमिनीवर कमर्शियल आणि रेसिडेन्शियल इमारतीला परवानगी आहे की नाही, याचे आकलन करावे. काहीवेळा मोठी इमारत उभारण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जमिनीचे कागदपत्रे तपासूनच जमीन खरेदीचा निर्णय घ्यावा. एवढेच नाही तर लोकेशनवर स्पेशल इकोनॉमिक झोन (एसईझेड) किंवा अन्य विकास योजना तर कार्यान्वित होणार आहे का यासंदर्भातही प्रशासनाकडून माहिती मिळवावी.

– अपर्णा देवकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)