भाषण करताना तोंडावरून खाली सरकला ‘मास्क’; राज्यमंत्र्यांनी भरला ‘दंड’

इंदापूर – कोरोनाचा कहर अजून सुरूच आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी मास्कचा वापर करण्याचे सांगण्यात येते. सध्या मास्क हीच लस असल्याचे देखील सांगितले जाते. विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

अशातच जंक्शन (इंदापूर) येथे एका खासगी कार्यक्रमात भाषण करताना मास्क तोंडावरून खाली सरकल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शंभर रूपयांचा दंड भरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे रविवारी जंक्शनमध्ये एका दुकानाच्या उद्घाटनाला गेले होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. अनेकांनी मास्क लावलेला नव्हता.

यावेळी भाषण करताना भरणे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. कोरोनाबाबतचे नियम पाळण्यास सांगितले. भाषण सुरू असतानाच त्यांच्या तोंडावरील मास्क खाली सरकला. भाषणानंतर भरणे यांनी लासुर्णे ग्रामपंचायत कार्यालयात विनामास्कचा 100 रूपये दंड भरला.

दरम्यान, युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. फ्रांन्स, ब्रिटन मध्ये पुन्हा लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क हिच लस समजून मास्कचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.