श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच माजी मुख्यमंत्री असणारे फारूक आणि ओमर अब्दुल्ला हे पिता-पुत्र नजरकैदेत किंवा ताब्यात आहेत. त्यांची भेट घेण्याची परवानगी त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) या पक्षाच्या जम्मूतील शिष्टमंडळाला मिळाली आहे.
परवानगी मिळाल्याने एनसीचे शिष्टमंडळ उद्या (रविवार) अब्दुल्ला यांच्या भेटीसाठी जम्मूहून रवाना होईल. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने 5 ऑगस्टला घेतला. त्यानंतर लगेचच त्या राज्यातील बहुतांश राजकीय नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार, फारूक अब्दुल्ला यांना त्यांच्या श्रीनगरमधील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर ओमर यांना सरकारी विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे.
एनसीच्या जम्मूस्थित नेत्यांच्या हालचालींवरही निर्बंध घालण्यात आले होते. ते निर्बंध दोन दिवसांपूर्वी हटवण्यात आले. त्यानंतर जम्मूस्थित नेत्यांनी तातडीची बैठक घेत अब्दुल्ला पिता-पुत्रांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची परवानगी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे मागण्यात आली. त्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने भेटीची परवानगी दिली.