नवी दिल्ली – उत्तर अरबी समुद्रामध्ये संशयित सागरी चाच्यांना पकडण्यासाठी भारतीय नौदलाची मोहिम अजूनही सुरू आहे. या सागरी चाच्यांनी एका व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या व्यापारी जहाजावर एकूण २१ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ कर्मचारी भारतीय आहेत.
एमव्ही लिला नॉर्फ्लोक या जाहाच्या अपहरणाचा प्रयत्न भारतीय नौदलाने शुक्रवारी हाणून पाडला होता आणि जहाजावरील या सर्व कर्मचार् यांची सुटका केली होती. जहाजाच्या डेकवर चढलेल्या चाच्यांना शोधण्यासाठी नौदलाचे कमांडो या व्यापारी जहाजाच्या डेकवर चढले होते.
मात्र तेथे कोणीही चाचे आढळले नाहीत. नौदलाने दिलेला इशारा आणि टेहळणी विमानांच्या घिरट्यांमुळे हे चाचे जहाज सोडून रात्रीच्या अंधारात पळून गेले असावेत. त्यानंतर या सागरी चाच्यांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू करण्यात आला आहे, असे नौदलाने म्हटले आहे.
एमव्ही लिला नृर्फ्लोक जहाजाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या देखरेखीखाली नियोजित मार्गावर मार्गस्थ होणार आहे, असे नौदलाने म्हटले आहे.